मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पकलेच्या माध्यमातून नवनवे आविष्कार घडवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना राज्य शासनाचा 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारसंदर्भात निवेदनाद्वारे घोषणा केली. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आता राज्य सरकारनं या मागणीची दखल घेत राम सुतार यांना पुरस्कार जाहीर केलाय.
राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलीय. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात. हुबेहूब, जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव इतके सुक्ष्म आणि बोलके असतात की, त्यातून काहीतरी संदेश पाहायला हमखास मिळतोय.
देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचं कामही राम सुतार यांनीच केलंय. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या 40 वर्षांत त्यांनी पन्नासहून अधिक भव्य शिल्पं तयार केलीत. संसद भवनात स्थापित करण्यात आलेलं महात्मा गांधी यांचं शिल्पही राम सुतार यांनीच तयार केलंय. त्यांनी आतापर्यंत महात्मा गांधींच्या अनेत मूर्ती तयार केल्या आहेत. तसंच सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचेही शिल्प राम सुतार यांनी तयार केलंय.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. राम सुतार यांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. तसंच, राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केलंय. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. त्यांचे पुत्र अनिल सुतार देखील एक शिल्पकार आहेत. अनिल सुतार यांनी आपल्या वडिलांसोबत शिल्प कलेत महत्त्वाची भूमिका बजावलीय.
मुंबई जवळील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (400 फूट उंच), मुंबईतीलच इंदू मिलमधील ‘स्टॅचू ऑफ इक्वॉलिटी’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (350 फूट उंच), पिंपरी-चिंचवड-मुळशी येथील छत्रपती संभाजी शिल्प (100 फूट उंच), अयोध्या येथील श्रीराम शिल्प (650 फूट उंच) ही भव्य शिल्पे निर्माण अवस्थेत आहेत. यासह अनेक लहान-मोठी शिल्पे त्यांच्या कारखान्यात तयार होतायेत. याशिवाय, नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. मात्र, हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर नव्यानं पुतळा उभारण्यासाठी बांधकाम विभागाकडून राम सुतार यांच्या कंपनीला काम देण्यात आलंय.