अमुलकुमार जैन
लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, तीन अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चिक्की विक्रेत्याला भर सकाळी लुटल्याचा प्रकार २० जुलै २०२५ रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडला.
गवळीवाडा परिसरातील ‘आरोही एंटरप्रायझेस’ या चिक्की दुकानाचे मालक पुनिकेत एकनाथ गायकवाड (वय २९, रा. वलवन, लोणावळा) सकाळच्या वेळेस आपल्या दुकानाची विक्रीसाठी तयारी करत असताना, चेहऱ्यावर मास्क व हातात हातमोजे घालून आलेल्या तीन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी गायकवाड यांच्यासोबत अनुप सुनिल पांडे (वय २०, रा. नांगरगाव, लोणावळा) हा कामगार उपस्थित होता.

दरोडेखोरांपैकी एकाने बंदूक काढून गायकवाड यांच्या डोक्याजवळ धरली, तर इतर दोघांनी मारहाण करत दुकानातील रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर हे तिघेही नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकलवरून काही क्षणांत घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, आरोपींचे हावभाव, मारहाण आणि पिस्तुलाचा धाक दिसून येतो. विक्रेत्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र बंदुकीचा धाक पाहून तो भयभीत झाला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक केरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. तसेच स्थानिक दुकानदार आणि साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लोणावळ्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशा ठिकाणी पहाटेच लूट होणं चिंताजनक असून, या घटनेनंतर इतर दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक दुकानदारांनी पोलिसांकडे सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जून महिन्यातही लोणावळा परिसरातील जैन मंदिर, मारुती मंदिर व तुंगार्ली येथील जखमाता मंदिर येथे चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं असून, लोणावळा शहर व परिसरातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन, सीसीटीव्ही तपासणी व सुरक्षा सूचना देण्याचे काम सुरू केलं आहे.
