लोणावळा दि. १८ : लोणावळ्याहून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात होऊन दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे–मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील ईदगाह मैदानाजवळ झाला.
मृत विद्यार्थ्यांची नावे सिद्धांत आनंद शेखर (वय 20, रा. झारखंड) आणि दिव्यराज सिंग राठोड (वय 20, रा. राजस्थान) अशी आहेत. तर हर्ष मिश्रा (वय 21) आणि निहार तांबोळी (वय 20) हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या बीबीए अभ्यासक्रमाचे हे चार विद्यार्थी बुधवारी रात्री लोणावळा येथे फिरायला गेले होते. गुरुवारी पहाटे ते मारुती स्विफ्ट कारने कॅम्पसकडे परतत असताना, देहूरोड बायपासवर त्यांच्या कारने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर ट्रक चालक मनीषकुमार सूरज मणिपाल (रा. मुंबई, वय 39) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
