रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. कोळसा वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने नियंत्रण सुटून सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात झरेवाडी (रत्नागिरी) येथील शिवम रवींद्र गोताड (वय 20) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
अपघातात शिवमसोबत प्रवास करणारा त्याचा मित्र निशांत कळंबटे (20, झरेवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. या दोघांची दुचाकी भरधाव ट्रेलरखाली चिरडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही आयटीआय रत्नागिरीचे विद्यार्थी असून, शिक्षण संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला.
हातखंबा हायस्कूलसमोरील तीव्र उतारावर कोळसा भरलेला ट्रक अनियंत्रित झाला आणि त्याने धडाधड सहा वाहनांना ठोकले. यात तीन ते चार दुचाकी, दोन कार तसेच आरटीओ विभागाची गाडीही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. धडक एवढी भीषण होती की, काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. हातखंबा परिसरात सतत घडणाऱ्या अशा अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
