प्रतिनिधी
महाड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील चाकरमान्यांचा कोकणाकडे होणारा प्रवास सुरू झाला आहे. मात्र या प्रवासादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ मुंबईहून मालवणला जाणाऱ्या खासगी बसला मध्यरात्री अचानक आग लागली. ही बस प्रवाशांसह जळून खाक झाली असून सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही.
माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास ही बस कशेडी बोगद्याजवळ पोहोचली असता चाकांमध्ये घर्षणामुळे अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच संपूर्ण बस पेट घेऊ लागली. प्रसंगावधान दाखवत चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यावेळी बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते.
या अपघातामुळे प्रवाशांचा जीव वाचला असला तरी त्यांचं सर्व सामान आगीत जळून गेले. घटनेची माहिती मिळताच खेड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर प्रवाशांना पर्यायी वाहनाची सोय करून सुरक्षितपणे पुढे पाठवण्यात आलं.
बसला लागलेल्या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून याबाबत तपास सुरू आहे. मात्र गणपती सणाच्या अगदी तोंडावर मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
