दोनदा जय्यत तयारी करूनही प्रवेश सोहळा रखडला; पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा
मुंबई : कोकणातील माजी नगराध्यक्ष आणि माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला असून, त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसे नेते अविनाश जाधव व संदीप देशपांडे यांनी अलीकडेच कोकणातील काही कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेर काढले होते. यात खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नलावडे आणि माणगावचे सुबोध जाधव यांचा समावेश होता. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली.
आपल्या बडतर्फीबाबत प्रतिक्रिया देताना वैभव खेडेकर म्हणाले होते, “ज्या पक्षासाठी २० वर्षे निष्ठेने काम केले, त्याच पक्षाने आम्हाला असे फळ दिले.” यानंतरच त्यांनी नवी राजकीय दिशा शोधण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवाच्या काळात वैभव खेडेकर यांनी कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करण्याची तयारी दाखवली. सुरुवातीला ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, मराठा आंदोलन आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या तब्येतीच्या कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
यानंतर त्यांच्या प्रवेशाच्या तारखेबाबत पुन्हा उत्सुकता निर्माण झाली. अखेर २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पक्षप्रवेश होणार असल्याचे फ्लेक्स लावण्यात आले. समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले. मात्र, पक्षप्रवेशाच्या दिवशीही अनपेक्षित अडचणी आल्या. भाजप कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्यावर पोहोचले असता, तेथे फक्त कर्मचारीच उपस्थित होते. रवींद्र चव्हाण स्वतः हजर नव्हते. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितेश राणे दिल्लीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कामानिमित्त निघून गेले. त्यामुळे खेडेकरांचा प्रवेश सोहळा पुन्हा रखडला.
पडद्यामागील हालचाली?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतीलच एका प्रादेशिक राजकीय पक्षाचा प्रभावी नेता खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रवेश इतक्या वेळा पुढे ढकलला जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
समर्थकांमध्ये संभ्रम
प्रवेशाच्या जय्यत तयारीनंतरही दोनदा वैभव खेडेकर यांना मागे हटावे लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपात प्रवेश नक्की कधी होतो? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
