मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
या व्हिडिओमध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी कथितरित्या पैशांच्या मोठ्या बंडलासोबत दिसत आहेत. दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अंबादास दानवेंचे आरोप: “शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, पण…”
अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना महायुती सरकारवर निशाणा साधला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?”
दानवे यांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप महाराष्ट्राला टॅग करत सरकारला जाब विचारला आहे.
या व्हिडिओमुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता असून, सरकार यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दानवे करणार तक्रार, चौकशीची मागणी
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार दिसत आहेत आणि मोठ्या नोटांचे बंडल आहेत. “हे पैसे कोणाचे आहेत, कशासाठी आहेत, याची चौकशी झालीच पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी यात कोणाचे थेट नाव घेतले नसले तरी, याबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.
महेंद्र दळवी यांचा आक्रमक पलटवार आणि आव्हान
दुसरीकडे, अंबादास दानवे यांच्या आरोपांवर शिवसेना आमदार महेंद्र दळवी चांगलेच भडकले आहेत. त्यांनी दानवेंवर ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याचा धंदा असल्याचा गंभीर आरोप केला.
दळवी म्हणाले की, अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पूर्ण पोस्ट करावा आणि त्यात दिसणाऱ्या लाल टी-शर्टवरील व्यक्तीचा चेहरा दाखवावा.
दळवींचे थेट आव्हान:
”त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो, तर आमदारकीचा राजीनामा देईन! यापेक्षा आणखी काय सांगावे.”
दळवी यांनी दानवेंना ‘अधिकृत फोटोसह पुरावे घेऊन नागपूरात या’ असे आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, हे कृत्य माझी बदनामी करण्यासाठी केले गेले आहे आणि यामागे कोण आहे, हे त्यांनी सांगावे. दळवी यांनी स्पष्ट केले की, तो फोटो किंवा व्हिडिओ माझा नाही, हे त्रिवार सत्य आहे आणि ते विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहेत.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिवेशनादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
