मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर उजाडला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. मुंबईतील ‘ब्ल्यू सी’ हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी “महाराष्ट्राच्या हितासाठी” एकत्र येत असल्याचे जाहीर केले.
‘शिवतीर्था’वर अभिवादन आणि शक्तीप्रदर्शन
पत्रकार परिषदेपूर्वी दोन्ही बंधूंनी सहकुटुंब दादर येथील ‘शिवतीर्था’वर जाऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर दोन्ही नेते एकाच ताफ्यातून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना झाले.
“आता फुटाल तर संपून जाल” – उद्धव ठाकरे
पत्रकार परिषदेची सुरुवात करताना उद्धव ठाकरे भावूक पण आक्रमक दिसले. ते म्हणाले, “आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी रक्त आटवले. आज पुन्हा दिल्लीत बसलेले लोक मुंबईचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत. अशा वेळी आम्ही भावाभावांनी भांडत बसणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अपमान ठरेल. आम्ही केवळ एकत्र आलो नाही, तर कायमचे सोबत राहण्यासाठी आलो आहोत.”
भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाला माझा एकच संदेश आहे—आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर कायमचे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा सोडू नका.”
“राजकीय पक्ष पळवणाऱ्या टोळ्यांना धडा शिकवणार” – राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत युतीवर शिक्कामोर्तब केले. ते म्हणाले, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या एका विचाराने आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या राज्यात पक्ष आणि आमदार पळवणाऱ्या राजकीय टोळ्या सक्रिय आहेत. त्यांना रोखण्यासाठी शिवसेना आणि मनसेची युती आजपासून अधिकृतपणे जाहीर करत आहे.”
जागावाटपाबाबत बोलताना राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, जागांचा आकडा आज जाहीर केला जाणार नाही, मात्र दोन्ही पक्षांचे उमेदवार एकत्रितपणे निवडणुका लढवतील.
युतीचे मुख्य कारण: मुंबई महापालिका आणि भाजपचा रथ रोखणे
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे आव्हान मोडीत काढण्यासाठी ठाकरे बंधूंनी हा मोठा निर्णय घेतला आहे. मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर गेल्या काही काळापासून दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद सुरू होता, ज्याचे रूपांतर आज अधिकृत युतीत झाले आहे.
