मुंबई: राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जवळपास निश्चिती झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या निडर आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाला पुन्हा एकदा प्रशासकीय शिस्त आणि आक्रमकता मिळण्याची शक्यता आहे.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मोठे फेरबदल
नाशिकचे स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी असलेल्या कथित जवळीकतेच्या वादात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या वादांमुळे आयोगाच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. ही प्रतिमा सावरण्यासाठी आणि महिलांच्या प्रश्नांना कायदेशीर व ठोस दिशा देण्यासाठी राज्य सरकारने एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याला पसंती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी अनेकदा या पदासाठी मीरा बोरवणकर यांच्या नावाची आग्रही मागणी केली होती.
अंडरवर्ल्डला धडकी भरवणारे नेतृत्व
मीरा बोरवणकर या १९८१ बॅचच्या निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईतील माफिया राजवट आणि अंडरवर्ल्डच्या दहशतीला मोडीत काढण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. किरण बेदींपासून प्रेरणा घेऊन पोलीस दलात दाखल झालेल्या बोरवणकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुंतागुंतीची आणि संवेदनशील प्रकरणे हाताळली आहेत. त्यांचे पती अभय बोरवणकर हेदेखील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
महिला आयोगाला मिळणार नवी ताकद?
महिला आयोग हे एक महत्त्वाचे संवैधानिक पद असून अध्यक्षांना अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ‘सुमोटो’ (स्वतःहून दखल घेणे) अधिकार आहेत. बोरवणकर यांचा पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभव, कायद्याची जाण आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची हातोटी पाहता, राज्यातील महिलांच्या सुरक्षा आणि न्याय हक्कासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सरकारकडून लवकरच या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
