• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठाकरेंच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल…माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

ByEditor

Sep 1, 2023

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होते आहे. शिवसेनेचे माजी नेते सुधीर मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे असं म्हणत माजी मंत्री अनिल परब यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधीर मोरे विक्रोळी पार्कसाईट विभागात वास्तव्याला होते. त्यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली होती. दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी या भांडवलाच्या जोरावर ते गेली अनेक वर्षे विक्रोळी पार्कसाईटमध्ये आपले वर्चस्व राखून होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात हमखास शिवसेनेचा नगरसेवक निवडून येत असे. नगरसेवक कोणीही असो पण त्याला सुधीर मोरे यांचाच वरदहस्त असे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये अन्य राजकीय पक्षांना सर्व ताकद पणाला लावूनही हे वर्चस्व मोडता आले नव्हते. त्यामुळे या भागात सुधीर मोरे यांच्या नेतृत्त्वाचा दबदबा होता. साहजिकच सुधीर मोरे यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
सुधीर मोरे यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या विभागात सुधीर मोरे यांची ओळख एक खंबीर नेता म्हणून होती. ‘अरे ला कारे’ करण्याची धमक असणाऱ्या शिवसैनिकांपैकी ते एक होते. त्यामुळे सुधीर मोरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुधीर मोरे यांच्या काही निकटवर्तीयांच्या मते गेल्या काही दिवसांपासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. याच दबावातून त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांना एक फोन आला. यानंतर सुधीर मोरे यांनी मी एका वैयक्तिक कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. ते अंगरक्षकांना सोबत न घेताच घराबाहेर पडले. त्यांनी नेहमीप्रमाणे स्वत:च्या गाडीने प्रवास करणे टाळले. ते रिक्षाने घाटकोपरला गेले. यानंतर सुधीर मोरे ट्रॅकवरुन चालत घाटकोपर आणि विद्याविहार या दोन स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडेअकराच्या दरम्यान ते रुळावर झोपले. त्यावेळी एक लोकल ट्रेन कल्याणवरुन सीएसएमटीच्या दिशेने जात होती. मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याच् पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ट्रेन वेगात असल्याने सुधीर मोरे यांच्या अंगावरुन गेली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे होऊ त्यांचा जागीच मृत्यू झाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!