• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भंगार माफियाच्या अनधिकृत गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ByEditor

Oct 27, 2023

अनधिकृत गोदामावर कारवाई केली नाही तर उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही

घन:श्याम कडू
उरण :
उरण नगरपालिका हद्दीत बोरी नाका येथे गेली अनेक वर्षांपासून भंगारची गोदामे उभी राहिली आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी वेळीच अग्निशमन व जनतेने तसेच शासकीय यंत्रणेने त्वरित उपाययोजना केल्याने तीन ते चार तासात आगीवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनधिकृत भंगार माफियांवर स्थानिक प्रशासन कारवाई करीत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ही अनधिकृत भंगार माफियांची दुकाने जमीनदोस्त करण्याची मागणी बोरी ग्रामस्थांकडून केली जाणार आहे. आगीचे निश्चित कारण समजले नाही.

उरण बोरी नाका स्मशानभूमीजवळ अनधिकृत भंगार माफियांनी बस्तान बसविले आहे. याविरोधारात अनेक तक्रारी दाखल होऊनही कारवाई होत नाही. उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तत्कालीन मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. मात्र, तत्कालीन मुख्याधिकारी माळी यांची बदली झाली, त्यानंतर मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनाही याची कल्पना देऊनही याकडे नगरपालिका प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसते. सदरचा परिसर मिनी कुर्ला म्हणून ओळखला जात आहे. उलट कारवाई होण्याऐवजी येथील समुद्रकिनारी असलेल्या खारफुटीवर भराव करून ते भंगार माफियांना भाड्याने देणे सुरू आहे. तसेच याठिकाणाहुन ओएनजीसीची गॅसची पाईपलाईन जाऊनही त्यांनाही याचे सोयरसुतक पडलेले दिसत नाही.

आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बोरी नाका येथील रमाझानच्या अनधिकृत गोदामाला आग लागली. गोदामात केमिकल, लाकूड, प्लास्टिक, लोखंडी सामान, काचेच्या बाटल्या यांचा खच पडलेला असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. याची दखल शासकीय यंत्रणेने घेऊन त्वरित सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी, एनएडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन ते चार तासाच्या अवधीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. यावेळी माजी नगरसेवक अतुल ठाकूर यांनी आपल्या मालकीचे पाण्याचे टँकर घटनास्थळी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी आग धुमसतच होती.

घटनास्थळी तहसीलदार उद्धव कदम, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वपोनी निकम, आमदार महेश बालदी, स्थानिक राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. आग नक्की कशामुळे लागली याची माहिती नाही. मात्र, आग लागली की लावली? हे ही गुलदस्त्यात असल्याची चर्चा उपस्थितीतांमध्ये सुरू होती. आगीचे रौद्ररूप पहाता आग भीषण होती. परंतु, आगीत जीवितहानी टळली असली तरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीची झळ शेजारील दोन इमारतींना बसली होती. त्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश मिळाले.

या आगीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन येथील अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. येथील स्थानिक नगरपालिका, पंचायत समिती, तहसिल विभाग व पोलीस यंत्रणा यांनी वेळीच या आगीवरून बोध घेत या परिसरातील अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली नाही तर लवकरच उरणची भोपाळपेक्षाही भयानक परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत लोकप्रतिनीधी, राजकीय पक्ष, पदाधिकारी यांची चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशाच प्रकारे उरणमधील शासकीय जागांवर भंगार माफिया, डिझेल माफिया, गुटखा-चरस माफियांनी शासकीय यंत्रणेला खरेदी करून अनेक गैरधंदे यामध्ये करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच या परिसरात असलेल्या कंपन्या, तसेच केमिकल कंपन्या यामुळे उरणमध्ये अशा आगी लागण्याच्या घटनेत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आगीवरून शासकीय यंत्रणेने बोध घेऊन ती जमीनदोस्त करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघ व बोरी ग्रामस्थांनी केली आहे.

By Editor

One thought on “भंगार माफियाच्या अनधिकृत गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान”
  1. इतक्या वर्ष ही भंगार गोदाम अनधिकृतपणे चालू होते तर नगरसेवक काय करत होते ? त्यांना कल्पना नसेल ? आमदार काय करत होते ? तालुका प्रशासन काय करत होते ? इतकं मोठं अनधिकृत भंगार गोदाम हे जगजाहीर होतं. सर्वाँना माहीत असून सुद्धा त्यावर कारवाई होत नव्हती ह्याचा अर्थ सगळ्यांना हप्ते पोहचत होते. मूळ कारवाई नगरसेवक , आमदार आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर झाली पाहिजे. कारण जर ह्यामध्ये जीवित हानी झाली असती तर त्यांना जबाबदार हे सगळे लोकप्रतिनिधीच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!