• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुमारे १९ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या उरण नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे लवकरच उद्घाटन

ByEditor

Jul 10, 2024

फुल मार्केट आणि समाज मंदिर बांधून तयार

अनंत नारंगीकर
उरण :
उरण नगर परिषदेने नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारत, फुल मार्केट आणि समाज मंदिराचे लवकर उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संकेत उरण नगर परिषदेकडून देण्यात आले आहेत. आचारसंहिता आणि विधिमंडळाचे अधिवेशन यामुळे या तीन इमारतींचे उदघाटन काहीसे लांबणीवर पडले होते. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून ही विकासकामे करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांच्या हस्ते या इमारतींचे उदघाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

उरण नगरपरिषदेची अत्याधुनिक प्रशासकीय इमारत जवळ जवळ पुर्ण झाली असून येत्या महिनाभरात या इमारतीचे उदघाटन करण्यात येणार आहे. या इमारतीचे जवळ जवळ ९० टक्के काम पुर्ण झाले असून फर्निचर आणि काही किरकोळ कामे वगळता ही सुसज्ज इमारत पुर्ण झाली आहे. ६.५० कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या इमारतीत कार्यालयाच्या फर्निचरचे काम सुरू असून त्यासाठी ३.५० लाख खर्च करण्यात येणार आहे.

५० कोटींहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या उरण नगरपरिषदेला आठ वर्षांत नियोजित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे कामगारांना पावसाळ्यात गळक्या जून्या इमारतीच्या छताखाली कामकाज करावे लागत आहे. उरण नगरपरिषदेचे कामकाज वाढले असून सुसज्ज आणि प्रशस्त अशा जागेची आवश्यकता आहे. १८व्या शतकातील उरण नगरपरिषदेने १५०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. नागरीकरण वाढल्याने व्यवसाय आणि व्यवहारांतही वाढ झाली आहे. त्यामुळे या शहराचा कारभार हाकण्यासाठी अद्ययावत कार्यालयाची आवश्यकता होती. २५ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर २० वाहनांसाठी वाहनतळ, पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालये, दुसऱ्या मजल्यावर अद्यायावत सभागृह आणि उ.न.प.ला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधकाम करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उरण नगरपरिषदेने ५.२५ कोटी रूपये खर्च करून नविन समाज मंदिर बांधले आहे आणि फुल मार्केटची इमारत देखिल नव्याने बांधली असून त्यासाठी ४.११ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या तीनही इमारती जवळजवळ बांधून पुर्ण झाल्या असून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहेत.

नियोजित प्रशासकीय इमारतीचे, फुल मार्केट आणि समाज मंदिराच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे महिनाभरात काम पूर्ण होऊन त्या नव्या इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडून सदर इमारतीत कार्यालय सुरू होईल.

-समीर जाधव,
मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!