मुंबई : ‘बिग बॉस मराठी ५’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे. त्याला ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीसोबतच रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. यासोबतचा त्याला केदार शिंदे यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे.
सूरज चव्हाण याला बक्षीस म्हणून १४.६ लाख रुपयांची रक्कम मिळालीच, पण सोबतच त्याच्यावर इतर बक्षिसांचा देखील वर्षाव झाला. त्याला तुनवाल मोटर्सकडून एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर देखील भेट म्हणून देण्यात आली आहे. त्याची ही मोठी झेप पाहून आता सगळेच त्याचे भरपूर कौतुक करताना दिसत आहेत. लिहिता वाचता ही येत नसलेल्या सूरजने आपल्या जिद्दीने इथवरची मजल मारली आहे. त्याचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. सूरजने हा प्रवास करण्यासाठी खूप संघर्ष केला होता. एका गावातून आलेल्या या मुलाने ही किमया करून दाखवली आहे.
दोन जोडी कपड्यांत आलेला सूरज!
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच सूरज चव्हाणची सर्वत्र चर्चा होताना दिसली होती. त्याने घरातील इतर स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण, सूरज जेव्हा ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल होती. या शोच्या सेटवर आल्यानंतर त्याला कपडे दिले गेले. या परिस्थितीतून वर आलेल्या सूरजने अल्पावधीतच आपल्या साधेपणाने आणि वागणुकीने सगळ्यांची मने जिंकली.