कोप्रोली प्राथमिक शाळेची दुरवस्था, मुले गिरवतात जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे धडे
अनंत नारंगीकर
उरण : कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यात शाळेचा पायाच ढासळू लागल्याने शिक्षण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. तरी सदर शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही ना याची खातरजमा करावी अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

२५ सप्टेंबर १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेणारे उरण तालुक्यातील कोप्रोली हे गाव आहे. या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ब्रिटीश सरकारच्या काळात या ठिकाणी दगडी शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती. मात्र, सुसज्ज अशा दगडी शाळेच्या इमारतीचे बांधकाम पाडून सर्व शिक्षण अभियान व ऑल कार्गो ग्लोबल लॉ. प्रा. या प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे ४५ लाख ६३ हजार रुपये खर्च करून ठेकेदारांच्या माध्यमातून प्राथमिक शाळेची इमारत उभी केली. मात्र, निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे इमारतीच्या स्लॅबला गळती लागून प्लास्टर गळू लागले आहे. यावर उपाय म्हणून पुन्हा लाखो रुपये खर्च करून शाळेच्या इमारतीवर पत्र्याचे शेड बांधण्यात आले.

मात्र शिक्षण विभागाच्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या म्हणीप्रमाणे सध्या इमारतीचा पाया, भिंती जीर्ण झाल्या असून पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेची इमारत पडली तर शाळेत अभ्यासाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. तरी सदर शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माझ्याकडे शाळेच्या इमारतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. शाळेचे बांधकाम जीर्ण झाले आहे. दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-प्रियांका पाटील
प्र. गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती उरण
कोप्रोली प्राथमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात आली नाही. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून सात लाख रुपये मंजूर झाले आहेत.
-सतिश शेंडगे
मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा कोप्रोली.