रायगड पोलीस व ‘सीएफआय’चा स्तुत्य उपक्रम
विनायक पाटील
पेण : आताच्या काळात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण बघता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व अशा प्रसंगातून स्वतःचे रक्षण कसे करावे हे त्यांना कळावे या हेतूने महाराष्ट्र राज्य पोलिसांनी अल्पवयीन “विद्यार्थी सुरक्षा जागरूकता” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर रायगड जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी त्यांनी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेची निवड केली. त्याप्रमाणे सीएफआय या संस्थेने रायगड पोलिसांसोबत मिळून पेण, सुधागड, उरण, रोहा, खालापूर या तालुक्यांमधील एकूण ३७ शाळांमध्ये हे शिबीर आयोजित करून जवळपास १२००० मुलांमध्ये जागृती निर्माण केली. हे शिबीर आयोजित करण्यासाठी सीएफआय संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख व रायगड पोलिस यांचे मार्गदर्शन लाभले.
या आयोजित केलेल्या शिबिरांदरम्यान उपस्थित असलेल्या सीएफआय संस्थेचे अधिकारी व सोशल वर्कर्स आणि इतर व्यावसायिक मार्गदर्शक तसेच उपस्थित पोलिस यांनी विद्यार्थी विद्यार्थीनीना चांगला व वाईट स्पर्श, तो कसा ओळखावा व कोणी वाईट स्पर्श केल्यास त्यातून कशी सुटका करावी व ते लपवून न ठेवता शिक्षक अथवा आई वडिलांना विश्वासात घेऊन सांगावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पोक्सो कायद्याविषयी व सायबर गुन्हे, डायल ११२, निर्भया पथक महिला सहाय्यक कक्ष व महिलांच्या सुरक्षा संदर्भात तसेच धोकादायक प्रसंगापासून आपली सुटका कशी करावी, धोकादायक प्रसंग कसे ओळखावे तसेच सायबर क्राइम कसे होतात ते झाल्यावर काय करावे आणि आपल्या आजूबाजूला होणार्या एखाद्या वाईट घटनेविषयी सतर्कता दाखवून पोलिसांना कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा या विषयी मार्गदर्शन केले.