मेलबर्न : एकिकडे मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी विराट कोहलीचा अपमान केला, त्याच्यासाठी अपशब्द वापरले. पण दुसरीकडे त्याच दिवशी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मात्र मोठा सन्मान करण्यात करण्यात आला.
सचिन तेंडुलकरचा सन्मान मेलबर्न क्रिकेट क्लबकडून करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबने आता मानद सदस्यता दिली आहे. भारतासाठी हा एक मोठा सन्मान आहे. कारण हा सन्मान मिळालेला सचिन तेंडुलकर हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी जगजाहीर केली आहे. कारण मेलबर्नच्या मैदानात सचिनला दिलेला हा सन्मान दाखवण्यात आला.
मेलबर्न क्रिकेट मैदानात सचिन तेंडुलकरने असाधारण कामगिरी केली आहे. सचिनने या मैदानात पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच कसोटी सामन्यांत सचिनने ४४.९० च्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत. भारताकडून या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही सचिनच्याच नावावर आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. यापूर्वी सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात सचिनला आता हा दुसरा सन्मान देण्यात आला आहे.