• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन ‘चॅम्पियन’

ByEditor

Feb 5, 2025

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस एकदिवसीय ४० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघाने अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघावर २९ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पेण स्पोर्ट्स असोसिएशनच्या संघाने ४० षटकांमध्ये ५ गडी गमावत २८९ धावा फलकावर नोंदवल्या. संघाचा कर्णधार व तंत्रशुद्ध सलामीवीर फलंदाज प्रतिक म्हात्रे याने १३७ तर मधल्या फळीत दमदार फलंदाजी करत देवांश तांडेल याने १०६ धावा ठोकत शतक झळकावले. अलिबाग संघाकडून रितेश तिवारी याने ३ फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देताना अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने कडवी झुंज दिली. सलामीला आलेला डावखुरा तडाखेबंद फलंदाज निकुंज विठलानी याने ११३ धावा काढून स्पर्धेतले तिसरे शतक झळकावले. त्याला श्रेयस कुमार यांनी ८४, रवी सोलंकी यांनी ३५ धावा काढून साथ दिली. ४० षटकांच्या समाप्तीनंतर अलिबाग संघानी २६० धावा काढून कडवी झुंज दिली मात्र त्यांचा २९ धावांनी पराभव झाला. पेण संघाकडून अभिषेक खातू याने २ फलंदाज बाद केले.

पेण संघानी सामना २९ धावांनी जिंकत स्पर्धेत चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला. ही स्पर्धा इनफोकस पिक्चरचे रोहित कार्ले व एचआर फिटनेसचे हृषिकेश राऊत यांनी पुरस्कृत केली होती. अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, खजिनदार प्रशांत ओक, आरडीसीएचे क्रिकेट प्रशिक्षक नयन कट्टा, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य रवींद्र तांडेल, शेखर भगत, अलिबाग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संदीप जोशी, इनफोकस पिक्चरचे रोहित कार्ले, एचआर फिटनेसचे हृषिकेश राऊत उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!