पुणे : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आज सायंकाळी विराम मिळण्याची शक्यता आहे. आज ठाण्यामध्ये धंगेकर शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
सुरवातीला पुणे लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्त असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पक्षापासून अलिप्त असलेले धंगेकर अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर स्टेटस आणि भेटीगाठीतून धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाबाबतचे संकेत देत होते.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नियुक्ती नुकतीच करण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी धंगेकर यांना डावलले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होती.