घन:श्याम कडू
उरण : करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्राय. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्ज (मालवाहतूक जहाज) मधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे पाठविला जात आहे. यामुळे या परिसरातील मच्छीमार संकटात सापडला आहे. तरी ही वाहतूक बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे.

या कोळशाच्या समुद्रमार्गी वाहतूकीबाबत मच्छिमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले असता, त्यांना हा गंभीर प्रकार लक्षात आला. कोळसा हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे तो समुद्रात पडल्यास त्या परिसरातील जल प्रदूषण होऊन मासे तेथून लांब जात असतात. तसेच कोळसा हा सहज विघटन न होणारा असल्यामुळे कोळसा व समुद्राचे खारे पाणी यांचे अपघटन होऊन विषारी रसायन तयार होते. त्यामुळे करंजा खाडीतील सागरी जैवविविधता व जलचारांचा नैसर्गिक अधिवास पूर्णत: नष्ट होणार आहे. या आधीच सदर कंपनीने भर समुद्रात लाखो ब्रास दगड-मातीचा भराव करून खारफुटीची कत्तल केली आहे. यामुळे हजारो मच्छिमारांच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे.

जिल्ह्यातील एकमेव सुरक्षित असणारी करंजा खाडी या कोळशाच्या वाहतूकीमुळे उध्वस्त होणार आहे. त्यामुळे हजारो मच्छिमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच कंपनीच्या मालवाहू जहाजांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने चॅनल (नौकानयन मार्ग) निर्धारित न केल्याने या मालवाहू जहाजांनी मच्छिमारांच्या जाळ्यांचे सुद्धा मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे मच्छिमार दोन्ही बाजूंनी भरडला जाणार आहे. कंपनीस जेट्टीवर कोळसा उतरविण्याची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र राज्य यांची परवानगी आहे काय? हे तपासून आपल्या स्तरावर लवकरात लवकर पर्यावरणाला घातक असणारी कोळसा वाहतूक बंद करावी, अन्यथा याचे तीव्र पडसाद आगामी काळामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी दिला आहे.