क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची निवड चाचणी आमंत्रित स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा संघ संघ देखील सहभागी होणार आहे. जिल्ह्याचा मुलींचा संघ निवडण्यासाठी दोन दिवसीय क्रिकेट शिबिराचे पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नगरपालिका मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदर शिबिरामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण याचे धडे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात आले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी विमेन्स क्रिकेटचे प्रशिक्षक शंकर दळवी, रवी सोलंकी, शैलेश महाडिक, सागर मुळे, शेखर भगत यांनी उपस्थित मुलींना क्रिकेटचे मार्गदर्शन केले. शिबिरासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मुलींना जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून प्रमाणपत्र देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व होतकरू युवा मुलींसाठी येणाऱ्या काळात भरपूर क्रिकेट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत केले जाईल असे आश्वासन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी याप्रसंगी दिले.
सचिव प्रदिप नाईक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी स्पर्धेच्या माध्यमातूनच निवड चाचणी घेण्यात येईल आणि प्रत्येक खेळाडूची निवड हि त्याच्या स्पर्धेतील कामगिरीवरच केली जाईल. आजच्या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सदस्य सुनिल घरत, प्रशांत ओक, राजेश पाटील, गणेश कडू, ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, प्रशिक्षक रवी सोलंकी, शैलेश महाडिक, शेखर भगत, प्रदिप खलाटे, सागर मुळे यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते.