आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि हवामानातील बदलांमुळे आरोग्याची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे केसांची योग्य निगा राखणं. सध्या पावसाळा सुरू आहे आणि या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे केस गळती, खाज, कोंडा अशा समस्या वाढू शकतात. अशावेळी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळच्या अंतराने केस धुणं आवश्यक ठरतं.
नेमकं किती वेळा केस धुणं योग्य?
केस धुण्याचा कालावधी सर्वांसाठी समान असू शकत नाही. हे तुमच्या केसांच्या प्रकारावर, स्कॅल्पमधील तेलाच्या प्रमाणावर, दैनंदिन सवयींवर आणि हवामानावर अवलंबून असतं.
- तेलकट स्कॅल्प असलेल्या लोकांनी आठवड्यातून २-३ वेळा केस धुणे आवश्यक असते.
- कोरडे किंवा कुरळे केस असलेल्या लोकांनी आठवड्यातून १-२ वेळा केस धुतले तरी चालतात. वारंवार धुणं टाळावं, कारण यामुळे नैसर्गिक तेल निघून जाऊन केस आणखी कोरडे होऊ शकतात.
- केमिकल ट्रीटमेंट केलेले किंवा वृद्ध वयाचे केस देखील कोरडे असतात, त्यामुळे अशा लोकांनीही केस कमी वेळा धुणं फायदेशीर ठरतं.
खूप दिवस केस न धुतल्यास काय होऊ शकतं?
केस खूप वेळ न धुतल्याने टाळूवर मळ साचतो, ज्यामुळे कोंडा, खाज आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते. शिवाय केसांमध्ये गुंतागुंत आणि गळती वाढू शकते. त्यामुळे केस धुण्याचा अतिरेक टाळावा, पण फार लांब अंतराने केस धुणंही योग्य नाही.
दररोज केस धुणं योग्य आहे का?
नाही. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, दररोज केस धुतल्यास टाळू व केसातील नैसर्गिक तेल कमी होऊन केस कोरडे, निस्तेज व कमजोर होऊ शकतात. त्यामुळे रोज केस धुणं टाळावं, विशेषतः जर स्कॅल्प तेलकट नसेल तर.
तुमचं केस धुण्याचं शेड्यूल हे पूर्णपणे तुमच्या केसांच्या प्रकारावर आणि स्कॅल्पच्या गरजांवर अवलंबून आहे. कोणत्याही एका नियमाचा अंधानुकरण करण्याऐवजी, स्वतःच्या अनुभवावरून व केसांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन योग्य अंतराने केस धुवा. आणि शक्य असल्यास केस धुताना सौम्य शॅम्पूचा वापर करा.